वेद हे आद्य, भारतीय, लोकसाहित्य आहे. वेद आद्य का, तर जगात वेदांइतके प्राचीन साहित्य इतर कोणत्याही समाजाचे, कोणत्याही भाषेत नाही. वेद भारतीय, कारण त्याची रचना भारतीयांकडून, भारतात, भारतातल्या एका प्राचीन भाषेत झाली. ती भाषा वेद तोंडपाठ म्हणणारांनी टिकवली, वाढवली, व्यापक केली. ती हजारो वर्षानंतर आजही भारतीयांना थोड्या प्रयत्नाने समजू शकते. वेदांना भारतीय म्हणण्याचे आणखी महत्त्वाचे कारण, वेदांचा आशय भारतीय आहे; भारतीय म्हणजे त्या काळातला भारतीय; आद्य भारतीय. वेद हे लोकसाहित्य आहे. वेद आधी लोक-वाक्-मय, लोकवाङ्मय होते; पिढ्यान्पिढ्या ते पाठ म्हणणाऱ्यांच्या मुखानेच सुरक्षित झाले. त्याचे लेखी रूप शेकडो वर्षांच्या मुखी परंपरेनंतर अवतरले. विशेष म्हणजे वेद लेखी रूपात उपलब्ध असतानाही वेदाचे मुखी रूप हेच प्रमाण, श्रद्धेय आणि पठनीय मानले गेले. मुखी रूपातले लोकवाङ्मय लेखी रूपात लोकसाहित्य होते. लोकवाङ्मयाच्या उद्गाराला मूळचे काही प्रयोजन असते, ते त्याच्या उद्गारानेच साध्य होते. लोकसाहित्य वाचणारा मात्र त्या प्रयोजनाच्या मर्यादा पार करून त्याचा विचार करू शकतो. लोकवाङ्मय-वेदाचे प्रयोजन, देवदेवतांची प्रार्थना व स्तुती हे होते; तर लोकसाहित्य-वेदाच्या अभ्यासकांनी त्याच्यावरून व्याकरण, भाषाशास्त्र, इतिहास, भूगोल वगैरे सिद्ध केले. सध्याच्या कालात लोकवाङ्मय-वेदाचा पाठ मोठ्या व्यापक प्रमाणावर होत नाही. लोकसाहित्य-वेदाचा अभ्यासही मर्यादित वर्तुळामध्येच चालतो. जुन्या काळापासूनच्या परंपरा जपणारी, त्यांना संस्कृतीचा मूळ आधार मानणारी, भारतीय जनता वेदांना मनोमन मात्र मानते. वेदवाक्य म्हणजे प्रमाण आज्ञा असा शब्दप्रयोग भारतीय भाषांमध्येच रूढ आहे. एके काळी वेदांचा पाठ करणारांनी ‘वेद म्हणजे ज्ञान’ असा अर्थ केला. धर्मविधी करताना वेदपाठ केलाच पाहिजे, त्याशिवाय विधी पवित्र होत नाही अशी धारणा त्या काळी शिष्ट समाजात पक्की होती. आता ती राहिली नाही, वेदांना मानवताविरोधी मानणारेही निघाले. तरी पण ‘आमच वेद, आमची पुराणे’ या संहतींना गूढ भावाच्या आदराने समाज मानीत असतो. लग्नकार्यात ‘वैदिक पद्धती’ला थोडा वरचा मान आहे. वेदमंत्र ऐकल्याने ‘बरे वाटते’ असे म्हणणारे अनेक लोक आजही भेटतील; त्यांना त्या मंत्रांचे शब्दसुद्धा पूर्णपणे समजलेले नसतात तर त्यांचा अर्थ कळणे लांबच. श्रद्धा-अश्रद्धा बाजूला ठेवून वेदांचा अभ्यास करणारांनी, भाषा, इतिहास, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांतले निष्कर्ष काढले आहेत. ते सामान्य जनांपर्यंत विशिष्ट धारणांच्या रूपात धुकटपणे पोचलेले आहेत. निष्कर्ष किंवा दावे वेदातल्या एका एका शब्दावरून, मंत्रावरून, फार तर लहानमोठ्या सूक्तावरून काढलेले असतात. वेदांच्या आशयाची पूर्ण ओळख त्यांतून होत नाही. लोकभाषांमध्ये समग्र वेदांचे अनुवादही झालेले आहेत. ते गद्यात आहेत आणि बहुधा प्रौढ, संस्कृतप्रचुर असे आहेत. त्यांत वेदाचे लोकवाङ्मयरूप बरेचसे हरवून जाते. तीस वर्षांपूर्वी मुलांच्या गाण्यांतून विज्ञान गाण्याचा प्रयोग केला. तो ‘युगाणी’ या नावानं प्रकाशित केला. त्यात ‘चांदोबा चांदोबा’ येऊ का’ म्हणणारा मुलगा आहे आणि सूर्याजी गोळ्याभोवती फिरत राहणाऱ्या नऊ लेकरांपैकी धरणी नावाची एक चिमखडी गोटी आहे. त्याच वेळी सुरू केलेला, इग्रंजी बाळगाण्यांना मराठमोळ्या गाण्यांच्या रूपात आणण्याचा प्रयोग ‘इमराठी गाणी’-मध्ये साकार केला. परंपरेतल्या लोकवाङ्मयाच्या उपयोजनाने नवे लोकसाहित्य घडवण्याचे हे प्रयत्न होते. ‘वेदातली गाणी’ हे प्राचीन भारतीय लोकवाङ्मयाचे मराठी लोकसाहित्यातले रूपांतर आहे. एकविसाव्या शतकातील मराठी-विकासाची वास्तू लोकसाहित्याच्या पायावर आधुनिक भाषिक-सांस्कृतिक साधनांचा व सामुग्रीचा उपयोग करूनच बांधता येईल. त्या भव्य भाव्य वास्तूतली, ‘वेदातली गाणी’ ही एक वीट होवो! ती मुद्रांकित करण्याला मित्रवर्य वेदविद प्रा. अर्जुनवाडकर यांचा विज्ञ हात लागला आहे हे प्रसादचिन्हच मानतो.
In stock
वेदातली गाणी
वेदातली गाणी
Reviews
There are no reviews yet.