“…मुक्तिबोधांना माणसाविषयी वाटणारा जिव्हाळा अस्सल व त्यांच्या मनात खोलवर गेलेला असा आहे. मुक्तिबोधांच्या प्रेमाची कक्षा इतकी मोठी आहे की विशिष्ट व्यक्ती, निसर्गातील सुंदर पदार्थ यांच्यापुरते ते मर्यादित राहू शकत नाही; ते यापुढे जाऊन सर्व मानवजातीला आपल्या कक्षेत सामावून घेते. मानवावर त्यांचे इतके गाढ प्रेम आहे की त्यावर अन्याय झालेला दिसला की ते साहजिकच पेटून उठतात; विशेषत: बहुजनसमाजावर सतत चाललेल्या जुलुमाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी, त्यांच्या यातनांना वाचा फोडावी म्हणून, त्यांच्यावरील अन्याय कायमचे दूर व्हावेत म्हणून आपण कविता लिहायला प्रवृत्त झालो आहोत असे मुक्तिबोध सांगतात: माझी सर्वोवरी प्रीत माझा सर्वोवरी लोभ परी तो ना बांधूं शके अशा जीवनाचा क्षोभ जीवनाचा क्षोभ? करी धरित्री आकांत पाषाणाशीं निर्झराची झुंज अविश्रांत ……….. आक्रंद्रते मानवता तमभिंतीआड ईश्वराच्या कृतीचा हा दुर्दैवी बिघाड दोहो वेळ साधण्याची जेथ पडे भ्रांत सांगा माझी जळती प्रीत कशी राही शांत?”
Reviews
There are no reviews yet.