आज लिहिल्या जात असलेल्या मराठी कवितेत शंकर रामाणी यांची कविता त्यांचे ‘एकट्याचे गाणे’ ‘एकल्याने’ गात आहे. त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती अमूर्त पातळीवरून व्यक्त होते. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी एक ‘स्पर्शाचे गाव’ आहे. ते कधी गाण्यात बुडते, कधी तुडुंब तंद्रीतल्या अथांगात न्हाते, कधी ते समीप येऊन कुशीत येते, तर कधी हे स्वप्नातले गाव निसटतेही. त्यामुळे ‘मी न येथे मी न तेथे/ मी कोणत्या यात्रेंतला’ किंवा ‘इथे तिथे कुठे काय/तुझें माझें नातें काय’ असा संभ्रम तिला पडतो. तिच्या रंघ्रारंघ्रात रुजू रुजू झालेला एक आर्तोत्सवही आहे. आणि आभाळ ल्यालेल्या पक्ष्याचे विध्द अनावर दु:ख त्यांच्या कवितेने आपल्या ओठात माळलेले आहे. शिशिरवृक्षाची कातर पितळीजर्द पानगळ आणि दु:खात भिजलेले काळेकरंद कमळ ल्यालेले काळोखाचे करवंदी तळे हेच तिचे प्राक्तन वाटत असले तरी मुलतानी रंगस्वरांचे आभाळ ओथंबून येऊन ‘हुंबर हवेचा सुगंधी सांगावा’ आता तिच्यापर्यंत आला आहे हेही जाणवते. मुक्तछंद ते शार्दूलविक्रीडित आणि ओवी-अभंग या छंदांपर्यंत विविध लयींतून आणि वैशिष्ट्यपूर्ण निसर्गप्रतिमांतून व्यक्त होणारी रामाणी यांची कविता ज्या खोल, गूढ उदासीचा प्रत्यय देते ती मराठीत कवितेत अपूर्व आहे.
Out of stock
पालाण
पालाण
Reviews
There are no reviews yet.