‘दोनुली’ हे या काव्यसंग्रहाचं नुसतं नाव नाही. त्यापेक्षा काही अधिक आहे. वेगळ्या ठाणमाणाच्या पंचवीससव्वीस कविता यात संग्रहित केल्या आहेत. ते ‘ठाणमाण’, भावानुभूतीचं ते भान या शब्दातून सूचित व्हावं. या कवितांचं स्वरूप द्विदलात्मक आहे असं मला प्रथम वाटलं होतं. पण त्या शब्दानं या काव्याचं यथार्थ आणि संपूर्ण रूपांकन होत नाही, असं नंतर लक्षात आलं. खरं म्हटलं तर ते रूप उगवत्या रोपासारखं आहे. खाली एकाच देठानं जुळलेलं, परंतु दोन दिशांनी झेपावणाऱ्या आपल्या दळदारपणानं त्या रोपाला एक वेगळा आकार देणारं, त्याच्या अस्तित्वाला जपणारं. रोपाच्या अस्तित्वाचं हे भान अन् दळांचं ‘दोघुलेपण’, जे या कवितेत व्यक्त होतं, त्याची कल्पना देण्यासाठी ‘दोनुली’ हा शब्द योजला आहे. दळं दोन असली रोपाला, तरी देठ एकच असतं. त्या देठाचं हे मनोगत. अर्थात शब्द इथं महत्त्वाचा नाही. त्या शब्दातून सुचविला जाणारा अस्तित्वधर्म महत्त्वाचा आहे. असं असलं, तरी शब्दालाही त्याचं एक स्थान असतं. तो अर्थाचं वहन करतो, तशीच त्याची जडणघडणही करतो. संकेतानं, सवयीनं आणि व्यावहारिक वापरानं नादाच्या एका विशिष्ट संघटनेला जेव्हा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, तेव्हा त्याचा शब्द होतो. या शब्दाभोवती जसं एक अर्थवलय असतं, तसं एक नादवलयही असतं. नादाच्या व अर्थाच्या या दोन वलयांच्या संयोगातून अर्थाचा बोध निश्चित्त होतो. अनेकदा त्याच्यामुळं शब्दाच्या मूलार्थाच्या कक्षाही रुदांवतात, बदलतात. नादातही अनुभूतीचं एक रूप असतं. म्हणूनच महाकवी आणि तत्त्वज्ञ ज्ञानदेव उद्गारतात, ‘आम्ही नादासी रूप देखिलें’. मी काही भाषाशास्त्रज्ञ नाही. तेव्हा शास्त्रपूत असं काही मला सांगता येणार नाही. परंतु कवितेच्या निमित्तानं शब्दांचं चालणं-डोलणं जवळून पाहिलं आहे. तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
Reviews
There are no reviews yet.