‘नवा दिवस’ हा कवितासंग्रह कोणासाठी आहे? हा काय प्रश्न झाला? या कविता जो कोणी आवडीने वाचील त्याच्यासाठी हा कवितासंग्रह आहे. एका अर्थाने हे उत्तर अगदी खरं आहे. जी कविता मला आवडते ती कविता माझी असते, माझ्यासाठी असते. इथे वयाची वगैरे अट असण्याचं कारण नाही. हा प्रश्न मी कां विचारला? आणि कां त्याचं उत्तर दिलं? ‘नवा दिवस’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. प्रश्न निर्माण होण्याचं कारण असं की, हा कवितासंग्रह १३ ते १६ या वयोगटातील वाचकांसाठी आहे, असं मी या कविता एकत्र करताना ठरवलं. ‘चांदोमामा’, ‘सुट्टी एके सुट्टी’, ‘आता खेळा नाचा’, ‘वेडं कोकरू’, ‘झुले बाई झुला’ या मी मुलांसाठी लिहिलेल्या पाच कवितासंग्रहांबरोबरच ‘नवा दिवस’ हा कवितासंग्रह’ मौज प्रकाशन’ने प्रसिद्ध केला. म्हणजेच, हा कवितासंग्रह मुलांसाठी-पण जरा मोठ्या, म्हणजे १३ ते १६ या वयाच्या मुलांसाठी-असा याचा अर्थ आहे. या वयोगटातील मुलांसाठी कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.